रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

तुळजाभवानी देवीची श्री.मुरली अलंकार महापूजा पाचव्या माळेला लाखो भक्तांनी घेतले दर्शन

तुळजाभवानी देवीची श्री.मुरली अलंकार महापूजा पाचव्या माळेला लाखो भक्तांनी घेतले दर्शन  


तुळजापूर (प्रतिनिधी) 


शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पाचव्या माळेला, रविवार मिती अश्विन शु. ६ , षष्ठी, शके १९४० दि.१४ रोजी तुळजाभवानी देवीची श्री. मुरली अलंकार महापुजा मांडण्यात आली. लाखाच्यावर भाविक भक्तांनी या मुरली  अलंकार महापूजेचे मनोभावे दर्शन घेतले. आई राजा उदो उदोच्या गजराने संपूर्ण मंदीर परिसर दुमदुमून गेला होता. 

शुक्रवारी पहाटे १ वा. देवीची चरणतीर्थ पुजा संपन्न होऊन मंदीर भाविकांसाठी खुले करण्यात आले. सकाळी ६ वा. नित्य अभिषेक पूजेची घाट देण्यात आली, त्यानंतर देवीस पंचामृत अभिषेक स्नान घालण्यात आले. सिंहासन पूजा संपन्न झाल्या. 

यावेळी मंहत तुकोजीबुवा, भोपे पुजारी संभाजी पाटील, अतुल मलबा, शिवराज पाटील, सचिन पाटील, नागेश भैय्ये, रुपेश परमेश्वर, संजय सोंजी, संकेत पाटील, प्रशांत सोंंजी, विकास सोंजी, मंदीर कर्मचारी दिलीप नाईकवाडी आदींची उपस्थिती होती.

अभिषेक विधी संपल्यानंतर धुपारती करुन अंगारा काढण्यात आला.

तुळजाभवानी देवीला महावस्त्र नेसवून विविध पारंपरिक अलंकारांनी मढवण्यात आले. रविवारी देवीची श्रीकृष्ण रुपातील श्री. मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली. अलंकार महापूजेच्या निमीत्ताने प्राचिन, पारंपारिक दाग-दागिन्यांनी देवीला मढवण्यात आले.

शारदीय नवरात्राच्या पाचव्या माळेला देवीस फिकट लाल  पदराचा लाल रंगाचा शालू नेसविण्यात आला. हिरव्या आणि सोनेरी जरीकाठीचा शालूमध्ये तुळजाभवानी देवीचे रुप अतीव मनमोहक दिसत होते. मस्तकावर नाजूक कलाकुसर केलेला माणिक, पाचू आदी रत्नजडित  सुवर्णमुकूट देवीने धारण केला होता. मुकुटावर सुवर्ण छत्र असून, मुकूटाच्या उजव्या बाजूस मोत्यांचा तुरा सोडण्यात आला होता. देवीला माणिक रत्नजडित सुवर्णनेत्र लावण्यात आले होते. भाळावर हळदी चंदनाचा लेप लावून बाजूस कुंकवाचा मळवट रेखला होता. हळदी-चंदनाच्या लेपावर शुद्ध कुंकू आणि चंदनाने विष्णूगंध रेखाटला होता. देवीस रत्न मोती जडित सुवर्णनथ घालण्यात आली. यानंतर देवीस प्राचिन दाग-दागिन्यांनी मढवण्यात आले. नाजूक कलाकुसर असलेल्या प्राचिन दागिन्यासह शिवकालीन सुवर्ण पुतळ्यांच्या माळा, पाचू, माणिक रत्नजडित जडवलेले सोन्याचे पदक, सुवर्णमाळा, रत्नहार, मोतीमाळा आदी विविध दागिन्यांनी सजवण्यात आले. 

यानंतर देवीची श्री. मुरली अलंकार ही विशेष अलंकार महापूजा मांडण्यात आली. यात देवीस श्रीकृष्णाचे रुप देण्यात आले. देवीने केस तिच्या उजव्या खांद्यावर मोकळे सोडले असून देवीने आपल्या हाती मुरली धारण केली आहे. मुकूटावर मोरपिस खोवले आहे. 

श्री. मुरली अलंकार महापूजेबाबत, तुळजाभवानी मातेने दैत्याचा वध केल्यानंतर सर्व देव, देवता दैत्याच्या त्रासातून मुक्त झाल्या. त्याप्रसंगी श्रीकृष्णाने आपली मुरली देवीस अर्पण केली, त्यामुळे मुरली अलंकार पुजा बांधली जाते. देवीच्या मुरलीवादनामुळे सर्व देव दैवी सुराचा मंगल आनंदानुभव घेऊ लागले, अशी पौराणिक कथा सांगितली जाते.

तुळजाभवानीचे श्री. मुरली अलंकार महापुजेतील रूप अत्यंत शांत आणि मनमोहक दिसत होते. लाखो भाविकांनी आई राजा उदो उदोच्या गजरात देवीच्या मुरली अलंकार महापूजेतील मंगलमय रुपाचे दर्शन घेतले.

तत्पूर्वी शनिवारी रात्री प्रक्षाळपूजा संपन्न होऊन सिंह वाहनावरून देवीचा छबिना काढण्यात आला. देवीची चांदीची उत्सवमूर्ती छबिन्याच्या सिंहवाहनावर ठेऊन मुख्य मंदीराभोवती प्रदक्षिणा घालत छबीना मिरवणूक संपन्न झाली. यावेळी मंदीर संस्थान अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे, महंत तुकोजीबुवा, देवीचे भोपे, पुजारी सेवेधारी, मंदीर व्यवस्थापक आणि कर्मचारी यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पाचव्या माळेला भाविकांनी पुढील प्रमाणे घेतला दर्शन

अभिषेक दर्शन 2210  

धर्म दर्शन 65662  

मुख दर्शन17455  

पेड दर्शन 6806




(उस्मानाबाद जिल्हयासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...