रविवार, २१ एप्रिल, २०१९

नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ल्यात बोट पलटी होऊन तीन लहान मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू मृतांमध्ये दोन मुली तर एक मुलाचा समावेश

नळदुर्ग /प्रतिनिधी 

 किल्ल्यात येणाऱ्या लोकांसाठी ठेवण्यात आलेल्या बोटीतून नौकाविहार करीत असताना बोटीत बसलेल्या मुलांचे  तोल समोरच्या बाजूला गेल्याने  बोट पलटी झाल्यामुळे तीन मुलांचे पाण्यात बुडाल्याने

 मृत्यू झाला. तर या बोटीत बसलेल्या इतर सहा जणांनासह बोट चालकाला वाचविण्यात यश आले. ही घटना 20 एप्रिल रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास नळदुर्गच्या ऐतिहासिक किल्ल्यात घडली. याबाबत सविस्तर माहिती अशी की नळदुर्ग येथील एहसान नय्यर काजी हे आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ऐतिहासिक किल्ल्यातील बोरी नदी मध्ये नौकाविहारासाठी असलेल्या बोटीत आपली दोन मुलं तसेच बहिणीच्या पाच मुली व भावाची एक मुलगी असे एकूण नऊ जणांना बोटीमध्ये बसून नौकाविहार करीत असताना बोटीत बसलेल्या मुलांपैकी काहीजण अचानक समोर आल्याने बोट समोरच्या बाजूला झुकल्याने पलटी झाली व या घटने मध्ये एहसान काजी यांचा मुलगा ईजान एहसान काजी वय 5 वर्षे व त्यांची पुतणी सानिया फरोख काझी वय 7 वर्ष सर्व रा. नळदुर्ग तसेच त्यांची भाची अलमास शफिक जागीरदार वय 12 वर्ष रा .मुंबई हे मुलं पाण्यात बुडवून मरण पावले तर त्यांच्यासोबत असलेले 1) सायमा शफिक जागीरदार वय 18 वर्ष 2) अफशा शफिक जागीरदार वय 16 वर्ष 3) बुशेरा शफिक जागीरदार वय 14 वर्ष  4)अननस नौशाद पटेल वय 12 वर्ष सर्व रा. मुंबई 5) एहसान नयर काजी वय 35 वर्ष व त्यांची मुलगी अलिजा एहसान काजी वय 5 वर्ष तसेच बोटीचा रायडर(चालक) श्याम गायकवाड यांना युनिटी मल्टीकॉन कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी व इतर लोकांनी सतर्कता बाळगून वाचविण्याचा प्रयत्न केला त्यामुळेच वरील 7 जणांना वाचविण्यात यश आले. या दुःखद घटनेत एहसान काझी यांना आपला एक मुलगा, एक पुतणी  व एक भाची गमवावी लागली या दुःखद घटनेमुळे काझी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.बोट उलटुन काही जण पाण्यात बुडाल्याची माहिती मिळताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वारे, हिना  शेख हे पोलीस फाटा घेऊन घटनास्थळी दाखल झाले. मयत पैकी सानिया फरोख काझी व ईजान एहसान काजी चुलत भावा बहिणी पाण्यात बुडाल्यामुळे त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यासाठी सुमारे तीन ते चार तास लागले यासाठी शहरातील काही तरुणांनी बोटीसह इतर मार्गाचा वापर करून मृतदेह बाहेर काढले. यावेळी तुळजापूरचे उपविभागीय अधिकारी  नीलम बाफना मंडळ अधिकारी गांधले, तलाठी कदम, रफिक फुलारी इत्यादी जणांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली व पंचनामा केला. तसेच या घटनेत मयत झालेली अलमास शफिक जागीरदार या मुलीस पाण्यात बुडाल्यानंतर तात्काळ बाहेर काढून येथील शासकीय रुग्णालयांमध्ये घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्यामुळे या मुलीला वेळेवर उपचार नाही मिळाल्यामुळे या मुलीचा मृत्यू झाल्याने मुलीच्या मृत्यूस कारणीभूत वैद्यकीय अधिकारी विरोधात कारवाई करावी म्हणून मुलीचे नातेवाईक व इतर लोक  मोठ्या प्रमाणात जमल्याने काही काळ  प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात तणाव निर्माण  झाला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन  तुळजापूरचे  उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप घुगे यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट दिले यावेळी मयत मुलीचे नातेवाईक व शहरातील लोकांनी नळदुर्ग प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकार्‍यांविरोधात कारवाई करावी म्हणून तुळजापूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी संदीप घुगे व जिल्हा आरोग्य अधिकारी यांना निवेदन दिले. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरात नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल वारे, हिना शेख यांनी संतप्त जमावाला शांत करून चोख बंदोबस्त ठेवला होता त्यामुळे मोठा अनर्थ टळला.  या दुःखद घटनेत तीन लहान मुलांना आपला जीव गमवावा लागला याबद्दल नळदुर्ग शहरात सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शुक्रवार, १९ एप्रिल, २०१९

वात्सल्य चारा छावणीस कडबा पेंडया भेट


नळदुर्ग/प्रतिनिधी

नळदुर्ग येथील काँग्रेसचे नगरसेवक श्री.बसवराज धरणे यांनी वात्सल्य संस्थेच्या माध्यमातून चालू असलेल्या गोवंश चारा छावणीस 400 कडबा पेंडी भेट दिली.सदरील मदत तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिराचे महंत श्री इच्छागिरी महाराज यांच्या हस्ते स्वीकारण्यात आली. 

यावेळी महंत श्री इच्छागिरी महाराज म्हणाले,की दुष्काळी परिस्थिती मुळे तालुक्‍यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाई बरोबर चाराटंचाईचे संकट शेतकर्‍यांसमोर उभे आहे. अशा परिस्थितीत जिवापाड सांभाळलेले दावणीचे पशुधन कसे सांभाळायचे असा प्रश्न शेतकऱ्यासमोर होता. याचे उत्तर वात्सल्य सामाजिक संस्थेने समाजातुन दानशूरांच्या  सहकार्यातून गोवंश चारा छावणी सुरू करून सोडवले आहे.सध्या ज्वारीच्या कडब्याला सोन्याचा भाव आला आहे.अशा स्थितीत श्री बसवराज धरणे यांनी 400 पेंडी कडबा भेट देऊन सामाजिक जाणिवेचे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे.

या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सोलापूर जिल्हा संघचालक शिवाजीराव  पाटील, प्रांत पदाधिकारी  निलेश भंडारी, शिवानंद कल्लुरकर,माधव पवार,अँड धनंजय धरणे,डॉ. अंबादास कुलकर्णी,उमेश नाईक, अँड जनक पाटील, अमित शेंडगे, प्रवीण चव्हाण,श्री भीमाशंकर बताले, अप्पू कलशेट्टी,

 कोप्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, १८ एप्रिल, २०१९

मतदान प्रक्रियेची गोपनीयता भंग केल्याने संबंधितांवर गुन्हे दाखल मतदान करतानाची छायाचित्रे व चित्रफितीचे केले समाजमाध्यमांव्दारे प्रसारण

उस्मानाबाद, दि.18- 

40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात दि.18 एप्रिल हा मतदानाचा दिवस होता. प्रशासनाने अतिशय व्यापक स्तरावर मतदार जागृती मोहीम पार पाडली. मात्र काही तरुणांनी मोबाईलचा वापर करुन मतदान करतानाची स्वत:ची छायाचित्रे व चित्रफितीचे समाजमाध्यमांव्दारे प्रसारण केले. 

त्यांची ही कृती लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 128 च्या तरतुदीचा व मतदान गोपनीयतेचाही भंग करणारी आहे. त्यामुळे संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी यांना दिले आहेत. 

त्यानुसार सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 240 उमरगा (अ.जा.) विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री.विठठल उदमले तसेच  सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, 242 उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघ तथा उपविभागीय दंडाधिकारी श्री.चेतन गिरासे यांनी संबंधितांवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याबाबत पोलीस स्टेशनला कळविले आहे. 

प्रशासनाने गेल्या काही दिवसांपासून मतदान केंद्रांमध्ये मोबाईलचा वापर निषिध्द असल्या बाबतची योग्य ती प्रसिध्दी देण्यात आली होती. तरीही काहींनी या सूचनांकडे दूर्लक्ष करुन मोबाईलचा वापर करुन मतदान करतानाची स्वत:ची छायाचित्रे व चित्रफितीचे समाजमाध्यमांव्दारे प्रसारण केले, त्यामुळे आता त्यांच्यावर गुन्हे दाखल होण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. 

****


बुधवार, १७ एप्रिल, २०१९

मतदार जनजागृतीसाठी उमरग्यातील माजी सैनिकांनी दिला आवाज 18 एप्रिल ला मतदान करा ! मतदान करा !


 


उस्मानाबाद /प्रतिनिधी 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अंतर्गत  जिल्ह्यात मतदान 18 एप्रिल रोजी होणार आहे. या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे.


अशाच प्रयत्नाचा भाग म्हणून आज बुधवार, दि. 17 एप्रिल रोजी सकाळी 10.30 वाजता उमरगा शहरात प्रांताधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विठठल उदमले व तहसिलदार संजय पवार,जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी श्रीमती मेजर फिरासत यांच्या मार्गदर्शनाखाली उस्मानाबाद माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शहाजी चालुक्य यांच्या नेतृत्वाखाली माजी सैनिकांच्या शिस्तबध्द अशा मतदार जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीतून माजी सैनिकांनी उमरग्यातील नागरिकांना आवाज दिला... 18 एप्रिल ला मतदान करा! मतदान करा! आपली लोकशाही बळकट करा!


या रॅलीत काशिनाथ चौधरी, सूर्यकांत जाधव, व्यंकट चौधरी, राजेंद्र बेंडकाळे, लक्ष्मण कलबुर्गे, ज्ञानेश्वर पवार, किशोर गायकवाड, खंडू दुधमाने, बालवीर शिंदे, केशव गायकवाड, आदिनाथ घोरपडे, अशोक सूर्यवंशी, शिवाजी वडदरे, शिवाजी सौंदर्गे, श्रीमंत आठोरे, बसवण्णा होंडरगे,बब्रुवान गायकवाड आदी माजी सैनिकांनी विशेष सहभाग नोंदविला. रॅलीच्या सुरुवातीस गटशिक्षणाधिकारी देविदास बनसोडे यांनी मतदार जागृती, मतदानाविषयीचे महत्व विषद केले व शेवटी शहाजी चालुक्य यांनी उपस्थितांचे आभार मानले.   


मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्‍यासाठी आपण मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महिला, खेळाडू, कलाकार, शिक्षक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी, तृतीयपंथी, जेष्ठ नागरीक, दिव्यांग, माजी सैनिक अशा सर्वांच्या सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभागाने विविध प्रकारे संपूर्ण जिल्हयात मतदार जागृती अभियान मोठया प्रमाणावर राबविण्यात आले. आता प्रतिक्षा आहे ती प्रत्यक्ष मतदान मोठया संख्येने होण्याची.


निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी गुरुवारी 18 एप्रिल रोजी मतदान निश्चित करावे, असे आवाहन सर्व जनतेला, मतदारांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक आर.राजा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी, समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी केले आहे.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)





मंगळवार, १६ एप्रिल, २०१९

जिल्हा प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी,उमेदवार लढतीसाठी तर जनता मतदानासाठी सज्ज !

 


 

 

उस्मानाबाद/प्रतिनिधी 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 च्या अंतर्गत  जिल्ह्यात मतदान 18 एप्रिल रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन निवडणूक प्रक्रियेसाठी… उमेदवार लढतीसाठी तर जनता मतदानासाठी सज्ज झाली आहे.

 या मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासन विविध माध्यमातून प्रयत्नशील आहे. जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्‍यासाठी आपण मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पोलीस कर्मचारी, महिला, खेळाडू, कलाकार, शिक्षक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी, तृतीयपंथी, जेष्ठ नागरीक, दिव्यांग, माजी सैनिक अशा सर्वांच्या सक्रिय आणि उत्स्फूर्त सहभागाने विविध प्रकारे संपूर्ण जिल्हयात मतदार जागृती अभियान मोठया प्रमाणावर राबविण्यात आले. आता प्रतिक्षा आहे ती प्रत्यक्ष मतदान मोठया संख्येने होण्याची.

निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी येत्या 18 एप्रिल रोजी मतदान निश्चित करावे, असे आवाहन सर्व जनतेला, मतदारांना जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, पोलीस अधीक्षक आर.राजा तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी-कर्मचा-यांनी, समाजातील प्रतिष्ठीत नागरिकांनी केले आहे.

दि.18 एप्रिल रोजी होणा-या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर निषिध्द - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे


 

उस्मानाबाद /प्रतिनिधी 

जिल्ह्यातील 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल वापरावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

मतदानाच्या दिवशी वा मतमोजणीच्या दिवशी पसरणारे आणि पसरविल्या जाणाऱ्या अफवांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणूनच मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष वगळता अन्य कोणत्याही कर्मचा-याला तसेच उमेदवाराच्या प्रतिनिधीलाही मतदान केंद्रात मोबाईल वापरता येणार नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. मतदान केंद्रातील माहिती चुकीच्या पध्दतीने बाहेर पडून त्यातून अफवा पसरु नयेत, हा आयोगाचा हेतू असून असे केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तात्काळ निकाली निघण्यास मदत होईल, लोकसभा निवडणूक पारदर्शीपणे पार पाडली जावी, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून मोबाईल बंदी हा त्याचाच एक भाग आहे.

बऱ्याचदा मतदान केंद्रात कार्यरत असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून केंद्रात चाललेल्या किरकोळ घडामोडींचीही माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून बाहेर असलेल्या व्यक्तींना दिली जाते, त्यामुळे अनावश्यक गंभीर गोष्टी घडतात. मतदान यंत्र, मतदार यादी यासंदर्भात मतदारांच्या तक्रारी असल्या तरी त्या मतदान केंद्रातच सोडविण्याची व्यवस्था निवडणूक यंत्रणेने केली आहे मात्र काही व्यक्तींकडून त्याबाबत चुकीचे संदेश मोबाईलव्दारे पसरविले जातात, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी मतदान कर्मचारी असो वा उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा मतदार यापैकी कोणालाच मोबाईल वापरता येणार नसल्याची खास दक्षता निवडणूक यंत्रणेने घेतली आहे. याबाबत उमेदवारांना यापूर्वीच अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत तर मतदारांनीही मतदानाला येताना शक्यतो मोबाईल आणूच नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडूनही करण्यात आले आहे. तरीही मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची व्यवस्था निवडणूक यंत्रणेने केली आहे.

मात्र केंद्रात काही अडचण निर्माण झाल्यास केंद्राध्यक्ष त्यांचा मोबाईल वापरू शकतात, अशी मुभाही त्यांना देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वापर करण्याबरोबरच चुकीचे संदेश व्हायरल करण्याचे प्रकार सर्रास घडतात त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये आणि मतदानाच्या दिवशी सर्व निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी, यासाठी निवडणूक आयोगाने सर्व बाबतीत विशेष दक्षता घेतली असून त्याची जिल्हा निवडणूक यंत्रणेकडूनही काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

तरी गुरुवार,दि.18 एप्रिल रोजी होणा-या मतदानाच्या दिवशी मतदारांनी, उमेदवारांनी, उमेदवारांच्या प्रतिनिधींनी, प्राधिकृत न केलेल्या अधिकारी-कर्मचा-यांनी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

मोफत पशुआरोग्य सर्वरोग निदान शिबीर संपन्न

नळदुर्ग/प्रतिनिधी 

भगवान महावीर जयंतीच्या निमित्ताने वात्सल्य सामाजिक संस्था,नळदुर्ग यांच्यावतीने पशुवैद्यकीय दवाखाना नळदुर्ग व पशुसंवर्धन विभाग पंचायत समिती,तुळजापूर यांच्या सहकार्यातून गोवंश चारा छावणी,रामतीर्थ नळदुर्ग येथे मोफत ‘पशुआरोग्य सर्वरोग निदान शिबिर’संपन्न झाले.यावेळी गर्भ तपासणी,खुरकत,लाळ लसीकरण,गोचीड इंजेक्शन, जंतनिर्मूलन याशिवाय पशूंच्या आरोग्याच्या दृष्टीने सर्व प्रकारची वैद्यकीय तपासणी झाली. प्रारंभी नळदुर्ग येथील व्यवसायिक एस.के.जागीरदार,जैन युवक मंडळ ग्रुपचे अध्यक्ष श्री सुधीर पाटील,उपाध्यक्ष श्री प्रवीण कासार, डॉ.अंबादास कुलकर्णी,श्री प्रभाकर घोडके, संस्थाचालक श्री वैभव जाधव, यांच्या हस्ते गोपूजन करून शिबिराची सुरुवात झाली.सदरील शिबिरासाठी नळदुर्गचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा रेडडी,परिचर श्री सुभान शेख, श्रीनिवास मुदावळे,सत्यजित कदम,सतिश राठोड,बालाजी जाधव यांचे सहकार्य लाभले

बुधवार, १० एप्रिल, २०१९

लोकराज्य मतदार जागृती सायकल रॅलीच्या निमित्ताने लोकराज्य निवडणूक विशेषांकाचे विमोचन



उस्मानाबाद /प्रतिनिधी

 मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियेतील संबंधित विस्तृत माहिती असलेला लोकराज्यचा  “राष्ट्रीय महोत्सव मतदानासाठी महाराष्ट्र सज्ज” हा लोकसभा निवडणूक विशेषांक उमेदवारांसह सर्वांसाठीच मार्गदर्शक व उपयुक्त असल्याचे प्रतिपादन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी दीपा मुधोळ- मुंडे यांनी आज येथे केले.


 माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित करण्यात आलेल्या लोकराज्य च्या लोकसभा निवडणूक या विशेषांकाचे विमोचन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, जिल्हा पोलीस अधीक्षक आर राजा, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक, सहाय्यक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू अभय वाघोलीकर, आंतरराष्ट्रीय खो-खोपटू सारिका काळे, तहसिलदार व  स्वीचे नोडल अधिकारी अभय मस्के, रवी मोहिते यांच्या उपस्थितीत झाले.


जिल्हा क्रीडा संकुलाच्या मैदानात आज मतदार जागृती अभियानाकरिता जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत लोकराज्य मतदार जागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी शासनाचे मुखपत्र असलेले  लोकराज्य विशेषांकाचे विमोचन मान्यवरांच्या  हस्ते करण्यात आले. या रॅलीला “लोकराज्य मतदार जागृती सायकल रॅली” म्हणून संबोधण्यात आले.


 लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यातील मतदान प्रक्रिया संदर्भातील विविधांगी माहिती लोकराज्यच्या या विशेषांकाच्या माध्यमातून जनतेसाठी एकत्र उपलब्ध करून देण्यात आली आहे. मतदान करण्याविषयी जनजागृती करण्याबरोबरच निवडणूक प्रक्रियासंबंधी विविध गोष्टींची विस्तृत माहिती या अंकात देण्यात आली आहे.


 मतदार नोंदणी केलेली कोणतीही व्यक्ती मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी निवडणूक आयोगातर्फे विशेष प्रयत्न केले जात असून यासाठी स्वीप मोहीम जिल्ह्यात व राज्यात यशस्वीपणे राबविण्यात आली आहे. या सोबतच दिव्यांगांनाही आपल्या मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विशेष सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत.


(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मतदार जनजागृती सायकल रॅली उत्साहात संपन्न जिल्हाधिकाऱ्यांसह पोलीस अधीक्षक आणि सीईओ स्वत: सायकलस्वार होवून सहभागी



 


 


उस्मानाबाद/प्रतिनिधी 

जिल्हा प्रशासनातर्फे आज मतदार जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला संबोधित करताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी उपस्थितांना “18 एप्रिलला मोठया संख्येने उत्स्फूर्तपणे मतदान करा, असे आवाहन केले.


यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा, जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडीक, तहसिलदार व  स्वीचे नोडल अधिकारी अभय म्हस्के, सहायक जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक बनसोडे, आंतरराष्ट्रीय सायकलपटू अभय वाघोलीकर, आंतरराष्ट्रीय खो-खोपटू सारिका काळे, रवी मोहिते आदी उपस्थित होते.


या रॅलीची सुरुवात जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते व मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून सकाळी 8 वाजता झाली. ही रॅली जिल्हा क्रीडा संकुल येथे सुरु होवून  छत्रपती शिवाजी हायस्कूल मार्गे बार्शी नाका-भोसले हायस्कूल-आंबेडकर चौक मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे  संपन्न झाली. या सायकल रॅलीत जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर. राजा हे स्वत: सायकल चालवित सहभागी झाले होते.


निवडणूक प्रक्रियेतील मतदारांचा सक्रिय सहभाग, यशस्वी व सुदृढ लोकशाहीसाठी अत्यंत महत्वाचे असल्याने 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी येत्या 18 एप्रिल रोजी मोठया संख्येने मतदान करावे, असे आवाहन करुन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी सायकल 

रॅलीकरिता उपस्थित असलेल्या अधिकारी, कर्मचारी, विदयार्थी, नागरीक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी या सर्वांचे आभार मानले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, पोलीस अधीक्षक आर.राजा यांनीही उपस्थितांशी संवाद साधून 18 एप्रिल रोजी सर्वांनी निश्चितपणे मतदान करावे, संविधानाने दिलेली ही अमूल्य संधी वाया घालवू नये असे आवाहन केले.


       जिल्ह्यात मतदानाबद्दल लोकांमध्ये जागृती निर्माण करुन मतदानाचे प्रमाण वाढावे, याकरिता भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विविध माध्यमातून सातत्याने जनजागृती करण्यात येत आहे. देशाच्या विकासाला दिशा देण्‍यासाठी आपण मतदान करणे, हे प्रत्येक मतदाराने लक्षात घेऊन जाणीवपूर्वक मतदान केले पाहिजे, यासाठी शासकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी- विद्यार्थीनी यांची मतदार जागृती सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती.


या सायकल रॅलीत शहरातील विविध सेवाभावी संस्थेचे प्रतिनिधी, क्रीडा संघटना, सामाजिक संघटना, श्रीपतराव भोसले हायस्कूल, आर्य चाणक्य विदयालय, आर.पी.कॉलेजमधील विद्यार्थी-विद्यार्थीनी  यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.


ही लोकराज्य मतदार जागृती सायकल रॅली यशस्वी करण्यासाठी अनिल वाघमारे, शशिकांत पवार, सिध्देश्वर कोम्पले, अयुब पठाण, योगेश थोरबोले, अजिंक्य वराळे, व्यंकटेश दांडे, फिरोज सेठ, अनिल लांडगे, सुरेश कळमकर, अश्फाक शेख,हाफिज शेख, प्रवीण बागल, संतोष देशमुख, दत्तात्रय जावळे, तानाजी खंडागळे, श्री बेगमपुरा यांनी विशेष प्रयत्न केले.



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

मद्य विक्री बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



 उस्मानाबाद/ प्रतिनिधी

भारत निवडणूक आयोगाने दहा मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू केली आहे, त्यानुषंगाने मतदान प्रक्रिया संपण्याच्या वेळेपूर्वीच्या 48 तासांमध्ये मद्य विक्री करण्यास मनाई जाहीर करण्याबाबत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 च्या कलम 135 (सी)अन्वये जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई मद्य निषेध कायदा 1949 कलम 142 (1) अन्वये मतदान व मतमोजणी शांततेत व सुव्यवस्थित पार पडावी यासाठी मतदानाच्या एक दिवस अगोदर तथा मतदान वेळ संपण्यापूर्वी अठ्ठेचाळीस तास अगोदर म्हणजेच दि. 16 एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजेपासून ते 17 एप्रिल 2019 रोजी संपूर्ण दिवस व मतदानाचा दिवस दि.18 एप्रिल 2019 रोजी मतदान संपेपर्यंत आणि मतमोजणीच्या दिवशी म्हणजेच दि. 23 एप्रिल 2019 रोजी संपूर्ण दिवस जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.  या आदेशाचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यास संबंधिताविरुद्ध मुंबई मद्य निषेध कायदा 1949 च्या कलम 54  व 56 नुसार कठोर कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले आहेत.


 



(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

रविवार, ७ एप्रिल, २०१९

वात्सल्य सामाजिक संस्थेचे काम आदर्शवत - बाळासाहेब हंगरगेकर

वात्सल्य सामाजिक संस्थेचे काम आदर्शवत

- बाळासाहेब हंगरगेकर 

नळदुर्ग:-दुष्काळामध्ये  होरपळणाऱ्या पशुधनासाठी कुठलीही शासकीय मदत न घेता समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने सुरू केलेली ‘गोवंश चारा’छावणी हा उपक्रम आदर्शवत असून सर्व गो प्रेमींनी या या संस्थेच्या मागे भक्कमपणे उभे राहून पाठबळ दिले पाहिजे असे प्रतिपादन स्टेट बँक ऑफ इंडियाचे वरिष्ठ अधिकारी श्री बाळासाहेब हंगरगेकर यांनी व्यक्त केले. 

‘रामतीर्थ’ नळदुर्ग, तालुका तुळजापूर येथे वात्सल्य सामाजिक संस्थेच्या माध्यमातून परिसरातील गरजू शेतकर्‍यांच्या गोवंशासाठी चारा छावणी सुरू झाली आहे.पहिल्याच दिवशी 48 पशुधन दाखल झाले असून गरजू शेतकऱ्यांनी 99 21 82 84 48 या क्रमांकावरती संपर्क करून गोवंश पशुधन दाखल करावीत असे आवाहन संस्थेने केले आहे. संस्था शेतकऱ्यांसाठी नाला सरळीकरण,बांध- बंधारे दुरुस्ती, गरजू शेतकर्‍यांच्या पाल्यांना शैक्षणिक मदत,शेती संबंधी मार्गदर्शन,चर्चासत्र आयोजित करते.जिल्ह्यात दुष्काळाच्या तीव्रतेमुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्याने मुक्या जनावरांची उपासमार होत आहे. संस्थेने सुरू केलेल्या गोवंश चारा छावणीमुळे या भागातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून गोवंश पालकांमधून समाधान व्यक्त होत आहे. 

याप्रसंगी डॉ. किरण पवार,रामतीर्थ देवस्थान चे पदाधिकारी श्री.बलभीम मुळे,श्री.सुरेश नकाते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तालुका संघचालक श्री.बळीराम काळे,विश्व हिंदू परिषदेचे श्री.संगमेश्वर पाटील, नगरसेवक  श्री.नितीन कासार, सरपंच श्री.ज्ञानेश्वर पाटील, श्री.आनंद जाधव, लक्ष्मण दुपारगुडे,किशोर सूरवसे, व्यंकट महाबोले,प्रणिता शेटकार, सुचिता हंगरगेकर,राधा मिटकर, प्रा.डॉ.जयश्री घोडके,उपप्राचार्य श्री. एस.एस. शिंदे,मुख्याध्यापक श्री पांडुरंग पवार,डॉ.अंबादास कुलकर्णी,उद्योग आघाडीचे श्री.उमेश नाईक,विकास जगदाळे यांच्या हस्ते गो-पूजन करून सुरुवात झाली. या प्रसंगी परिसरातील गो-प्रेमी शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

शनिवार, ६ एप्रिल, २०१९

सावरगावात वाऱ्यासह झालेल्या पावसात चार एकर केळीची बाग उध्वस्त

सावरगावात वाऱ्यासह झालेल्या पावसात चार एकर केळीची बाग उध्वस्त


काटी/ प्रतिनिधी  तुळजापूर  तालुक्यातील सावरगाव  परिसरात  गुरुवार  दि.( 4 ) रोजी  सायंकाळी  सहा वाजनेच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे 

 येथील विद्यमान सरपंच तथा शेतकरी रामेश्वर  तोडकरी  यांच्या  चार एकर केळीची बाग उध्वस्त  झाली  असून सुमारे  पाच लाखांचे नुकसान झाले आहे.  हाता-तोंडाशी आलेले केळीचे पीक जमिनदोस्त झाल्याने सरपंच  रामेश्वर  तोडकरी  यांचे  सुमारे पाचलाख रुपयांचे नुकसान झाले आहे. तलाठी रवि अंदाने यांनी  शुक्रवारी दुपारी  प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन केळी बागेचा नुकसानीचा पंचनामा  केला  असून  पंचनाम्यात पाच-लाखाचे  नुकसान झाले  असल्याचे  नमूद करण्यात आले आहे. सरपंच  रामेश्वर  तोडकरी  यांनी प्रतिकूल परिस्थितीत  आपल्या  शेतात  चार एकर केळीची लागवड केली  होती. 

गुरुवारी  सायंकाळी  वादळी वाऱ्यासह झालेल्या  पावसाने  चार एकर  केळीची बाग उध्वस्त झाली.  त्यामुळे  तोडकरी  यांचे वार्षिक  नियोजन  कोलमडले आहे. चार एकर केळीची बाग उध्वस्त  झाल्याने यातून  मिळणारे सुमारे  पाच-लाखाचे नुकसान झाले आहे. रामेश्वर   तोडकरी  यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन या पिकाची पाहाणी करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

गुरुवार, ४ एप्रिल, २०१९

आताच्या सरकारने कर्जमाफी सोडाच फक्त ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्येच शेतकरी दमवला- मधुकरराव चव्हाण

    आताच्या सरकारने कर्जमाफी सोडाच फक्त ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्येच शेतकरी दमवला- मधुकरराव चव्हाण



     तुळजापूर/ प्रतिनिधी
गावातील प्रत्येक जागृत  नागरिकाने आपल्या गावात थांबून प्रत्येक घरातील व्यक्तीला आपल्या मताच्या अधिकाराचं महत्त्व पटवून सांगावे. प्रत्येकाने आपले गाव सांभाळून शंभर टक्के मतदान कसे होईल हे पहा, अन्यथा लोकशाहीची 'अब की बार फिर मोदी सरकार' ठोकशाही केल्याशिवाय राहणार नाही. असे परखड मत माजी दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री आमदार मधुकरराव चव्हाण साहेब यांनी व्यक्त केले.
      काटगाव (ता. तूळजापूर) या ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस,स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, रिपाई(क-ग) मित्रपक्ष संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उमेदवार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे सर्व पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना मधुकरराव चव्हाण म्हणाले," काटगाव मधील लोकांनी काँग्रेसवर प्रेम केले. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये काटगावने काँग्रेसला मदत केली. सर्वांनी मिळून काम केले. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये संघर्ष येत असतो. मीही संघर्षातूनच घडलो आहे. तसाच संघर्ष मधल्या काळामध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असला तरी परका आक्रमण करत असेल तर सगळे एकत्र येऊन परक्याला त्याची जागा दाखवतात.तशीच वेळ आता आली आहे. पाच वर्षांपूर्वी भूलथापा देऊन 'अच्छे दिन'चे स्वप्न दाखवून  नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले.त्यांनी आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांना दिलेले एक ही वचन पाळले नाही.नरेंद्र मोदी यांनी किती थापा मारल्या त्याची यादी करा. ती यादी वाचायला तास लागेल. पंधरा लाख रुपये सर्वसामान्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यापासून ते परदेशातील काळा पैसा  भारतामध्ये परत आणावयाचा शब्द पाळला नाही. नोटबंदी करून अनेक छोटे-मोठे उद्योग बंद  पाडले .कुठे गेला काळा पैसा ?नोट बंदीच्या नावाखाली उद्योगपतींचा काळा पैसा पांढरा करून घेतला.
   शरद पवार कृषिमंत्री असताना एका झटक्यात 72 कोटी रुपये शेतकऱ्यांचे कर्ज माफ केले. आताच्या सरकारने कर्जमाफी सोडाच फक्त ऑनलाईन फॉर्म भरण्यामध्येच शेतकरी दमवला. पण !कर्जमाफी काय अजून केलेली नाही .कर्जमाफीची मुदत संपली तरी या सरकारचा अजून अभ्यास चालू आहे. सत्ता नसतानाही आपल्या भागाचा विकास करण्यासाठी 100 कोटीचा निधी आणला. आजवर ग्रामीण भागाच्या विकासासाठी विधानसभेमध्ये आवाज उठविला. या भागातील शेती, पाणी ,वीज ,उद्योग, रोजगार यासारखे अनेक प्रश्न मार्गी लावले. त्यासाठी विधानसभेमध्ये आवाज उठवला. काटगाव मध्ये सर्व समाजाचे लोक एकत्र गुण्यागोविंदाने राहत आहेत.'हम सब एक है' यामुळे आपल्या भागाची पंचक्रोशीत ओळख आहे. लोकांनी आता ठरवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीला निवडून लोकसभा आणि विधानसभेवर तिरंगा फडकवायचा आहे .आता पाच वर्षे गायब असणारे हंगामी उमेदवार तुमच्या दारात येतील. त्यांना एकच प्रश्न विचारा. तुम्ही पाच वर्षात आम्ही अडचणीत असताना आमच्यासाठी काय केले ते सांगा? मग मताचे बोलू.तुमच्या एकाही प्रश्नाचे समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळणार नाही.आजवर या भागामध्ये काम केल्यामुळे चौथीपिढीसुद्धा संयुक्त पुरोगामी महाआघाडीच्या मागे ठामपणे उभे आहे. त्यामुळे आपला विजय निश्चितआहे.यावेळी महाआघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले .
            यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, रिपाई (क-ग)चे सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते, युवक ,युवती ,महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



(

उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

अभिनंदन यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवून आणल्याच्या थापा मारणारे कुलभूषण जाधव यांचे नाव आले की, 56 इंचाची छाती 15 इंचाची करून घेतात -शरद पवार

उमरगा/प्रतिनिधी

 राज्य आणि देशात उत्तम कारभार करण्याची कुवत केवळ कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसकडेच आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यापासून मनमोहनसिंग यांच्यापर्यंत त्या क्षमता वेळोवेळी सिध्द केल्या आहेत. त्यामुळेच तर मागील 70 वर्षात जगाच्या नकाशावर एक समृध्द देश म्हणून आपण स्वत:ची ओळख निर्माण केली. इतिहासाचे आकलन कमी असलेले नरेंद्र मोदी मागील 70 वर्षात आम्ही काय केले ? असा सवाल उपस्थित करीत आहेत. त्यांनी इतिहासाचा नीट अभ्यास करावा, मागील 70 वर्षात आम्ही देशाला मजबूत केले असल्याचे त्यांच्या आरोआप लक्षात येईल, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी जाहीर सभेला संबोधित केले. संयुक्त पुरोगामी महाआघाडीचे उस्मानाबाद लोकसभा मतदार संघाचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारार्थ गुरूवारी दि 04 रोजी उमरगा येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील, माजीमंत्री आमदार मधुकरराव चव्हाण, माजी आमदार सि. ना. आलुरे गुरूजी, कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस आमदार बसवराज पाटील, अशोक पाटील निलंगेकर, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ, राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, कॉंगे्रसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे, आमदार राहुल मोटे, शिक्षक आमदार विक्रम काळे, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, ज्येष्ठ नेते जीवन गोरे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार, शेकापचे भाई धनंजय पाटील, युवा नेते सुनील चव्हाण, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे, रिपब्लिकन कवाडे गटाचे अॅड. मल्हारी बनसोडे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते शरण पाटील यांच्यासह आघाडीतील प्रमुख नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. 

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, पुलवामा प्रकरणाचे आम्ही कधीच राजकारण केले नाही. मात्र भाजपा आणि नरेंद्र मोदी यांच्या वायफळ गप्पा पाहून शहिद सैनिकांच्या कुटूंबियांनी राजकीय फायदा घेणे थांबवा, अशा शब्दात कान उघडणी केली. अभिनंदन यांना पाकिस्तानच्या तावडीतून सोडवून आणल्याच्या थापा मारणारे कुलभूषण जाधव यांचे नाव आले की, 56 इंचाची छाती 15 इंचाची करून घेतात. सैनिकांनी गाजविलेल्या शौर्याचे श्रेय लाटू नका. 2014 पासून आजवर किती हल्ले झाले ? त्यात किती जणांना जीव गमवावे लागले ? याची माहिती जाहीर करण्याचे धाडस या सरकारमध्ये नाही. देशावर मागील 70 वर्षात पावणे तीन लाख कोटी रूपयांचे कर्ज होते. मागील पाच वर्षांत त्यात कमालीची वाढ झाली आहे. हे कर्ज आता पाच लाख 40 हजार कोटींच्या घरात पोहचले आहे. त्यामुळे जगातील कर्जबाजारी देशांच्या रांगेत या सरकारने आपल्याला नेवून ठेवले आहे. आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या मुलांना बेवारस म्हणून अपमान करणारांना जनता माफ करणार नाही. जोवर आपण आहोत, तोवर देशातील शेतकरी कधीच बेवारस होऊ देणार नाही. त्यासाठी शेतकरी, कष्टकर्‍यांचे प्रश्न समजून घेणार्‍या राणाजगजितसिंह पाटील यांना मोठ्या मताध्नियाने विजयी करा, असे आवाहनही शरद पवार यांनी यावेळी केले. 

यावेळी बोलताना माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर म्हणाले की, देशासाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्वाची आहे. यावेळी गफलत झाली तर देश आणि देशाचे भवितव्य अडचणीत येईल ? त्यामुळे मजबूत लोकशाहीकरिता सध्या परिवर्तनाची नितांत गरज आहे. देशातील पुढच्या पिढीला सुकर भविष्य देण्याकरिता या सरकारला पायउतार करणे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे आणि हे परिवर्तन आपण नक्की घडवून आणू, देशाला आजच्या टप्प्यावर आणण्यासाठी मागील 70 वर्षांत कॉंग्रेसने केलेले काम क्रांतिकारी आहे. कॉंग्रेसने सातत्याने देशातील नागरिकांच्या सेायीसुविधा आणि भविष्यातील गरज ध्यानात घेवून आखणी केली. त्यामुळेच आज भारत जागतिक पातळीवर एक सक्षम सत्ता म्हणून उदयास आलेला आहे. अॅटोमिक अॅनर्जी, स्पेस एनर्जी, सॅटेलाईट, टीव्ही, मोबाइल आदी तंत्रयुगाची सुरूवात कॉंग्रेसच्या काळात सुरू झाली आणि आज प्रत्येकजण या साधन सुविधांचा योग्य पध्दतीने लाभ घेत आहे. कॉंग्रेसच्याही काळात अनेकवेळा सर्जीकल स्ट्राईक झाले, परंतु सैन्याने गाजविलेल्या या शौर्याचा आपण राजकीय फायद्यासाठी कधीच उपयोग केला नाही. कॉंग्रेसने सैन्याचा आणि शहिद सैन्यांच्या कुटूंबियांचा कधीही अपमान केला नाही. मात्र आता विद्वेशाचे राजकारण सुरू आहे. त्याला दूर करून मजबूत लोकशाहीकरिता परिवर्तन घडविण्यासाठी उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. 

माजीमंत्री तथा औशाचे आमदार बसवराज पाटील यांनी, आघाडीचे उमेदवार आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना निवडून देण्याचे आवाहन करीत असतानाच उमरगा आणि लोहारा तालु्नयातून 40 हजारांहून अधिक मताध्नियाने राणाजगजितसिंह पाटील यांना लिड देणार असल्याचे जाहीर केले. माजीमंत्री आमदार मधुकर चव्हाण यांनीही यावेळी उपस्थित जनसमुदायाला आघाडी सरकारच्या काळात केलेल्या लोकोपयोगी कामांची माहिती दिली आणि उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. 

यावेळी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रशांत चेडे यांचीही समयोचित भाषणे झाली. प्रास्ताविकपर मनोगतात आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी मागील 40 वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांनी स्वत: दिलेले योगदान अनेक उदाहरणांसह सांगितले. भविष्यात रोजगार, पर्यटन त्याचबरोबर शेतीपूरक उद्योगांसाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी मानले. कार्यक्रमास लोहारा, उमरगा, औसा तालु्नयातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

प्रास्ताविकपर मनोगतात आघाडीचे उमेदवार राणाजगजितसिंह पाटील यांनी मागील 40 वर्षांत जिल्ह्याच्या विकासासाठी डॉ. पद्मसिंह पाटील आणि त्यांनी स्वत: दिलेले योगदान अनेक उदाहरणांसह सांगितले. भविष्यात रोजगार, पर्यटन त्याचबरोबर शेतीपूरक उद्योगांसाठी आपण काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी मानले. कार्यक्रमास लोहारा, उमरगा, औसा तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 


-- 

(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क- 8087544141,8432860606)

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

नेते प्रचारात मतदार दुष्काळात निवडणुकीच्या नावाखाली अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार ग्रामीण भागात भिषण पाणी टंचाई

नेते प्रचारात मतदार दुष्काळात

निवडणुकीच्या नावाखाली अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार ग्रामीण भागात भिषण पाणी टंचाई


तुळजापूर / प्रतिनिधी 


तालुक्यात गत वर्षी सरासरी पेक्षा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने तसेच उन्हाची तीव्रता वाढत असल्याने ग्रामीण भागातील नागरीक पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती . विहीर,बोअर,हातपंप,तलावांच्या पाणीपातळीत वेगाने घट होत असून,परिणामी तालुक्यातील पाणी प्रश्न भेडसावणाऱ्या ३३ गावांमध्ये ६० खाजगी विहीर,बोअर अधिग्रहणावर प्रशासनाला ग्रामस्थांची तहान भागवावी लागत असली तरी वन्य प्राणी व पशु पालकांच्या जनावरांना पिण्याच्या पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था प्रशासनाने करावी अशी मागणी होत आहे.सततच्या दुष्काळी परिस्थिती मुळे  शेतकरी हा दुष्काळाच्या सावटाखाली मेटाकुटीला आला आहे. आणि दुसरीकडे लोकसभा निवडणूकीचे वारे यामुळे पुढारी प्रचारराजकारणात व्यत आणि अधिकारी निवडणूकीच्या अनुशंगाने माझी डीवटी बाहेरगावी आहे . अशी उत्तरे देतात पुढारी व अधिकाऱ्याच्या निषकाळजी , कामचुकार अधिकाऱ्यामुळे तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात भिषण पाणी टंचाई


तुळजापूर तालुक्यात १२३ गावाचा समावेश असताना १०८ ग्रामपंचायती तालुक्यामध्ये अस्तित्वात आहेत.अल्प पर्जन्यमाना मुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थिती ने ग्रामीण भागात पाणी टंचाई चे  भीषण रूप धारण केले आहे.त्याप्रमाणे ग्रामीन भागातून पंचायत समिती  स्तरावर विहीर,बोअर अधिग्रहणा सह टँकर साठी प्रस्ताव दाखल होत आहेत.त्याप्रमाणे पंचायत समिती ,तहसील प्रशासन स्थळ पंचनामा करून उपाय योजना करीत आहे.त्याप्रमाणे तालुक्यातील पाणी प्रश्न भेडसावणाऱ्या ३३ गावांमध्ये ६० खाजगी विहीर ,बोअर अधिग्रहनाद्वारे ग्रामस्थांना पाणी पुरवठा केला जात आहे.तसेच पंचायत समिती कडे ८ प्राप्त प्रस्तावापैकी ३ प्रस्तावाची गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांनी संयुक्त पाहणी केली असून पाच प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर प्रलंबित आहेत.तर पंचायत समिती कडे खुदावाडी,भातंब्री, वडगाव काटी,चिवरी येथून टँकर ची मागणी आली आहे,यातील भातंब्री येथील प्रस्ताव तहसील कडे पाठविण्यात आला आहे.याचबरोबर अधिग्रहण केलेल्या विहीर बोअरचे ही पाणी ग्रामपंचायतिच्या नियोजनामुळे ग्रामस्थाना वेळेवर मिळत नसल्याची ही तक्रारी आहेत. 


तसेच तालुक्यातील साठवण स्रोत पूर्ण क्षमतेने भरू शकले नाहीत,सध्या उन्हाची तीव्रता ही वाढू लागली असून यामुळे विहीर, तलाव,बोअर, कोरड्या पडत आहेत,लघु आणि मध्यम प्रकल्पातील पाणी साठा ही दिवसेंदिवस झपाट्याने खालावत आहे.तालुक्यात २० लघु प्रकल्प असून यापैकी १३ प्रकल्पात मृत साठा शिल्लक आहे.गंजेवाडी येथील एक प्रकल्प कोरडा ठाक पडला आहे.तसेच कसई प्रकल्पात ३१.९६ टक्के,आरळी ०.२५ टक्के,सांगवी- माळूंब्रा १६.९०टक्के ,इटकळ ३६.६३ टक्के,निलेगाव ४६.०५ टक्के,सांगवी काटी ०.०९ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.


तसेच ४३ साठवण तलावापैकी ११ साठवण तलाव मृत साठ्यात आहेत,तर आपसिंगा,गंजेवाडी,केशेगाव, चिकुंद्रा, होर्टी क्रं १,सलगरा म,लोहगाव,नंदगाव,हंगरगा नळ,देवसिंगा तुळ, केमवाडी, फुलवाडी, वानेगाव, चिवरी क्रं १,चिवरी क्रं २,वडगाव हे १६ तलाव कोरडे ठक पडले आहेत.तर काळेगाव तलावात १०.०१टक्के,कुंभारी ८.८२टक्के,तामलवाडी ३४.३२ टक्के,देवकुरुळी ०.८५टक्के, धोत्री ४.३२ टक्के,अरबळी ०.०९ टक्के साठवण तलावात शिल्लक पाणी साठा आहे.तर नळदुर्ग ,अणदूर सह तुळजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कुरनूर मध्यम प्रकल्पामध्ये सध्या ८.५५ टक्के,अलियाबाद,जळकोट,नंदगाव, सिंदगाव या गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या खंडाळा मध्यम प्रकल्पामध्ये १३.८७ टक्के उपयुक्त पाणी साठा शिल्लक आहे.असे असली तरी पाटबंधारे उपविभागाच्या साप्ताहिक पाणी पातळी अहवालानुसार असे दिसून येते की मध्यम प्रकल्पासह साठवण तलाव,लघु प्रकल्पामधील पाणी पातळीत झपाट्याने घट होत चालली आहे.


शेत शिवारातील बारमाही वाहणारे नदी, नाले,तलाव हेच जनावरांच्या ,वन्य प्राण्यांचे पाणी पिण्याचे एकमेव स्त्रोत आहेत.मात्र हेच स्रोत कोरडे पडल्याने वन्यप्राण्यासह पशुपालकांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे. नदी नाले,तलाव उन्हाळ्यापुर्वीच कोरडे पडल्याने उन्हाळ्याचे चार महिने तीव्र पाणी टंचाई चा सामना करावा लागणार आहे.पाणी टंचाई चा प्रश्न अधिक गंभीर झालेला आहे.एकवेळ गावातील नागरिक, महिला ,लहान मुले पाण्यासाठी आपल्या शिवारातील ज्या विहिरीना व बोअरला पाणी आहे अशी ठिकाणी हातामध्ये भांडी घेऊन पिण्याच्या पाण्याचा शोध घेऊन आपली तहान भागविताना दिसतात, मात्र पशुपालकांची जनावरे,वन्य प्राण्याना पिण्यासाठी पाणीच उपलब्ध होत नसल्यामुळे वन्य प्राणी,पशुपालकांच्या जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे.


(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...