मंगळवार, १६ एप्रिल, २०१९

दि.18 एप्रिल रोजी होणा-या मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर निषिध्द - जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे


 

उस्मानाबाद /प्रतिनिधी 

जिल्ह्यातील 40-उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात 18 एप्रिल रोजी मतदान होणार असून निवडणूक आयोगाकडून मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर मोबाईल वापरावर निर्बंध लावण्यात आले आहेत.

मतदानाच्या दिवशी वा मतमोजणीच्या दिवशी पसरणारे आणि पसरविल्या जाणाऱ्या अफवांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो म्हणूनच मतदान केंद्रातील केंद्राध्यक्ष वगळता अन्य कोणत्याही कर्मचा-याला तसेच उमेदवाराच्या प्रतिनिधीलाही मतदान केंद्रात मोबाईल वापरता येणार नाही, असे निर्देश निवडणूक आयोगाकडून देण्यात आले आहेत. मतदान केंद्रातील माहिती चुकीच्या पध्दतीने बाहेर पडून त्यातून अफवा पसरु नयेत, हा आयोगाचा हेतू असून असे केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न तात्काळ निकाली निघण्यास मदत होईल, लोकसभा निवडणूक पारदर्शीपणे पार पाडली जावी, यासाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात असून मोबाईल बंदी हा त्याचाच एक भाग आहे.

बऱ्याचदा मतदान केंद्रात कार्यरत असलेल्या उमेदवारांच्या प्रतिनिधींकडून केंद्रात चाललेल्या किरकोळ घडामोडींचीही माहिती भ्रमणध्वनीच्या माध्यमातून बाहेर असलेल्या व्यक्तींना दिली जाते, त्यामुळे अनावश्यक गंभीर गोष्टी घडतात. मतदान यंत्र, मतदार यादी यासंदर्भात मतदारांच्या तक्रारी असल्या तरी त्या मतदान केंद्रातच सोडविण्याची व्यवस्था निवडणूक यंत्रणेने केली आहे मात्र काही व्यक्तींकडून त्याबाबत चुकीचे संदेश मोबाईलव्दारे पसरविले जातात, त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. हे टाळण्यासाठी मतदान कर्मचारी असो वा उमेदवारांचे प्रतिनिधी किंवा मतदार यापैकी कोणालाच मोबाईल वापरता येणार नसल्याची खास दक्षता निवडणूक यंत्रणेने घेतली आहे. याबाबत उमेदवारांना यापूर्वीच अशा सूचनाही देण्यात आलेल्या आहेत तर मतदारांनीही मतदानाला येताना शक्यतो मोबाईल आणूच नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडूनही करण्यात आले आहे. तरीही मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्याची व्यवस्था निवडणूक यंत्रणेने केली आहे.

मात्र केंद्रात काही अडचण निर्माण झाल्यास केंद्राध्यक्ष त्यांचा मोबाईल वापरू शकतात, अशी मुभाही त्यांना देण्यात आली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात वापर करण्याबरोबरच चुकीचे संदेश व्हायरल करण्याचे प्रकार सर्रास घडतात त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य बिघडू नये आणि मतदानाच्या दिवशी सर्व निवडणूक प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पाडावी, यासाठी निवडणूक आयोगाने सर्व बाबतीत विशेष दक्षता घेतली असून त्याची जिल्हा निवडणूक यंत्रणेकडूनही काटेकोर अंमलबजावणी केली जात आहे.

तरी गुरुवार,दि.18 एप्रिल रोजी होणा-या मतदानाच्या दिवशी मतदारांनी, उमेदवारांनी, उमेदवारांच्या प्रतिनिधींनी, प्राधिकृत न केलेल्या अधिकारी-कर्मचा-यांनी मतदान केंद्रात मोबाईलचा वापर करु नये, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...