गुरुवार, १४ मार्च, २०१९

शिवसेना, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना उस्मानाबादमध्ये सस्पेन्स कायम


शिवसेना, राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना

उस्मानाबादमध्ये सस्पेन्स कायम

उस्मानाबाद/प्रतिनिधी

लोकसभा निवडणुकीची घोषणाहून चार दिवसांचा कालावधी लोटला तरी शिवसेना व राष्ट्रवादी काँगेसचा उमेदवार ठरलेला नाही.शिवसेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड आपली दावेदारी कायम असल्याचे सांगत असले तरी संभाव्य उमेदवारांच्या यादीत त्यांचे नाव नसल्याने सेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे व माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांची नावे आघाडीवर आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आमदार राणाजगजीतसिंह पाटील की त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांच्या नावावर अजून सस्पेन्स कायम आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार कधी जाहीर होणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.

 

उस्मानाबादमधील कोणत्याही निवडणुकीत राजकीय संघर्ष पाहायला मिळतो. आता तर लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक जाहीर झाल्या आहेत. त्यामुळे या लढतीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. १९९६ पासून उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर याठिकाणी कोणत्याच उमेदवाराला दुसऱ्यांदा संधी मतदारांनी दिली नाही. त्यामुळे या इतिहासाची पुनरावती झाली तर उस्मानाबादचा खासदार हा नवाच असणार यामध्ये तिळमात्र शंका नाही.

 

१९९६ साली सर्वप्रथम शिवसेनेचे शिवाजी उर्फ बापू कांबळे विजयी झाले होते. त्यानंतर १९९८ मध्ये काँग्रेसचे अरविंद कांबळे विजयी झाले होते. १९९९ मध्ये पुन्हा शिवसेनेचे शिवाजी उर्फ बापू कांबळे विजयी झाले तर २००४ साली सेनेच्या कल्पना नरहिरे यांनी राष्ट्रवादीचे माजी मंत्री ढोबळे यांचा पराभव केला होता. त्यानंतर सर्वसाधारण गटासाठी खुला झाल्यानंतर २००९ साली राष्ट्रवादीचे डॉ. पद्यसिंह पाटील पाच हजार मतांने विजयी झाले होते तर २०१४ साली सेनेचे रवींद्र गायकवाड मोदी लाटेत विक्रमी मताने विजयी झाले होते.

 

यंदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी उस्मानाबाद जिल्ह्यातील राजकीय समिकरणे बरीच बदलली आहे. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले असल्याने यंदाची लोकसभा निवडणूक लक्षवेधी ठरणार हे मात्र नक्की. सेनेचे विद्यमान खासदार रवींद्र गायकवाड यांना पुन्हा लोकसभेला उमेदवारी मिळेल असे वाटत होते. परंतु गेल्या १५ दिवसांतील मुंबईतील मातोश्रीवर वेगळ्याच हालचाली होत आहेत. त्यामुळे उमेदवार बदलण्याची शक्यता सर्वाधिक आहे. नुकत्याच झालेल्या संभाव्य उमेदवारांच्या यादीत उस्मानाबाद व मावळ मतदारसंघातील खासदारांच्या नावावर अजून शिक्कामोर्तब नाही असा स्पष्ट उल्लेख केला आहे. त्याशिवाय उस्मानाबाद व मावळ वगळता सर्व खासदारांना पुन्हा कामाला लागा अशा सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या उस्मानाबाद मतदासंघात उमेदवार बदलाची शक्यता अधिक आहे.

 

नवा चेहऱ्यास उमेदवारी देण्याचे ठरल्यास उस्मानाबाद  जिल्हा सहसंपर्कप्रमुख अनिल खोचरे यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी खासदार गायकवाडवर नाराज असलेल्या गटाने घेतली आहे. त्यासोबतच खोचरे यांचे मुंबईतील संबध पाहता त्यांचे नाव या क्षणीतर आघाडीवर आहे. याशिवाय माजी आमदार ओम राजेनिंबाळकर यांच्या नावावर देखील चर्चा झाली. मात्र, त्यांचा रस लोकसभेपेक्षा उस्मानाबाद विधानसभसाठी अधिक असल्याने त्यांचे नाव थोडंस मागे पडले आहे.

 

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पक्षाने आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे नावच फायनल केले असल्याचे समजते. मात्र, त्यांनी अजून होकार अथवा नकार कळविला नसल्याने कोण निवडणूक लढविणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. उस्मानाबाद झेडपीच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील यांनी गेल्या महिनाभरापासून मतदारसंघात सर्वत्र प्रचार सुरू केला आहे. मात्र, अचानक राणाजगजीतसिंह पाटील त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांचे नाव पुढे करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाटील पती-पत्नीपैंकी एकाचे नाव फायनल होणार हे मात्र निश्चीत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीची उमेदवारी डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या घरीच राहणार आहे. केवळ त्यांच्या नावाची घोषणा होणे बाकी आहे.

 

 

उस्मानाबादच्या जागेवर भाजपची दावेदारी

दरम्यान, सेनेकडून सर्वसंमतीने उमेदवार ठरत नसल्याने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जागा भाजपला सोडण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे उस्मानाबाद जिल्हा भाजपकडून पण उस्मानाबादची जागा भाजपला सोडावी अशी मागणी मुख्यमंत्री फडणवीस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याकडे आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतत्वाखाली करण्यात आली होती. मात्र, विद्यमान खासदारांची जागा शिवसेना सोडेल असे सध्या तरी वाटत नाही.





(उस्मानाबाद जिल्ह्यासह महाराष्ट्र्रात लोकप्रिय असलेले साप्ताहिक न्यूज सिक्सर ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी संपर्क 8087544141,8432860606)

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...