रविवार, १३ मे, २०१८

जगदाळे-धस लढतीकडे सर्वांचे लक्ष राष्ट्रवादी-काँग्रेस ‘साथ-साथ’ तर सेनेचे ‘एकला चलोरे’


जगदाळे-धस लढतीकडे सर्वांचे लक्ष

राष्ट्रवादी-काँग्रेस ‘साथ-साथ’ तर सेनेचे ‘एकला चलोरे’


उस्मानाबाद - बीड-लातूर-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पुरस्कत अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे व भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्यात चुरशीची लढत होत असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान,  लातूरमध्ये झालेल्या बैठकीत राष्ट्रवादी- काँग्रेसची आघाडी एकमेकासोबतच असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे जगदाळे यांचे पारडे सध्यस्थितीत जड वाटत आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे उपनेते तथा अामदार तानाजी सावंत यांनी सेनेने भाजपला पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केल्याने धस काहीसे बॅकफूटवर गेले आहेत.

 

गेल्या काही दिवसांपासून बीड-लातूर-उस्मानाबाद विधानपरिषदेची निवडणूक चुरशीची होणार असे  चित्र असताना गेल्या दोन  दिवसांपासून घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे लढतीत मोठा टिवस्ट आला आहे. अपक्ष उमेदवार जगदाळे रिंगणात असल्याने धस यांना सोपी वाटणारी निवडणूक आता आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांना राष्ट्रवादी व काँग्रेसने पाठिंबा दिल्याने व सर्व नेतेमंडळी एकदिलाने प्रचारासाठी मैदानात उतरल्याने अवघड वाटू लागली आहे.

लातूर येथे आघाडीचे उमेदवार अशोक जगदाळे यांच्या प्रचारार्थ काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार अमित देशमुख, आमदार राणाजगजितसिंग पाटील, आमदार त्र्यंबक भिसे, आमदार विक्रम काळे, संजय बनसोडे, माजी आमदार बाबासाहेब पाटील, जीवन गोरे, धीरज देशमुख, शैलेश पाटील-चाकूरकर, व्यंकट बेद्रे, बसवराज पाटील-नागराळकर, पप्पू कुलकर्णी, मकरंद सावे उपस्थित होते. ही सर्व मंडळी एकत्र आल्याने राजकीय  विश्लेषकांचे डोळे वटारले आहेत. सुरुवातीला जगदाळे यांना काँग्रेस पाठिंबा देणार नाही असे चित्र काही जणांनी रंगवले होते. मात्र धनजंय मुंडे यांनी काँग्रेसच्या उस्मानाबाद जिल्ह्यातील आमदार बसवराज पाटील, मधूकर चव्हाण, प्रशांत चेडे यांची भेट घेतली तर बीडमधील राजकिशोर मोदी यांची भेट घेऊन त्यांना आपलेसे केले. त्यानंतर लातूरमध्ये देशमुखांच्या गडीवर बैठक घेऊन सर्वांना एकत्र आणले आहे. त्यामुळे आता आघाडीच्या नेत्यानीच आम्ही साथ-साथ आहोत अशी घोषणा केली तर दुसरीकडे दिलीप देशमुख यांनी या मतदारसंघातून पुन्हा मीच निवडणूक लढवावी, असा दोन्ही पक्षांचा आग्रह होता. मात्र, माझी यावेळी इच्छा नव्हती. १८ वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसने आम्हाला सहकार्य केले. त्याची परतफेड करण्यास यावेळी काँग्रेस उत्सूक आहे. त्यामुळे तीन जिल्ह्यातील काँग्रेसचे एकही मतदान आघाडीच्या उमेदवाराशिवाय इतरांना जाणार नाही असे सांगितले तर या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत असल्याचा दाखला देत ‘हम साथ साथ है’चा नारा आमदार अमित देशमुख यांनी दिला. त्यामुळे आता या दोन पक्षातील मतभेद संपल्याचे पुढे आले आहे.

 

दुसरीकडे उस्मानाबादमध्ये भाजपचा युतीमधील सहकारी पक्ष असलेल्या शिवसेनेची बैठक झाली. त्यामध्ये शिवसेनेचे उपनेते तथा अमदार तानाजी सावंत यांनी सेनेने भाजपला पाठिंबा दिला नसल्याचे स्पष्ट केले. विधान परिषद निवडणुकीत युतीबाबत पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांनी निर्णय अद्याप जाहीर केलेला नाही. शिवसेनेचा उमेदवार नसल्यामुळे इतर पक्षाच्या उमेदवारांच्या गाठीभेटी घ्या मात्र कोणाला मतदान करण्याचे आश्वासन देण्याच्या भानगडीत पडू नका. मतदानाच्या एक दिवस अगोदर पक्षप्रमुख ठाकरे आदेश देतील त्याच उमेदवाराला मतदान करा. वसुली किंवा इतर उद्योगाच्या भानगडीत पडू नका, गद्दाराला शिवसेनेत माफ केले जात नाही त्यामुळे विषाची परिक्षा घेवू नका असा सल्ला सावंत यांनी शिवसेना पदाधिकार्‍यांना दिला. शिवसेना गेमचेंजर आहे विधान परिषद निवडणूकीत हार-जीत आम्ही ठरवू तुर्तास तरी आमचा एकला चलोरेचा नारा असल्याचे सावंत म्हणाले. भाजपने शिवसेनेला गृहीत धरत खच्चीकरण सुरू केले आहे हे स्वाभिमानी शिवसेना खपवून घेणार नाही. विधान परिषद निवडणुकीत शिवसेना गेम चेंजर असून हार किंवा जीत आम्ही ठरवु असे आमदार सावंत म्हणाले. त्यामुळे भाजपचे धाबे दणाणले आहेत. या बैठकीस शिवसेनेचे मीडिया सेलचे गोविंद घोळवे, जिल्हा प्रमुख अनिल खोचरे, माजी आमदार ओमराजे निंबाळकर, नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर, युवासेना जिल्हाध्यक्ष सुरज साळुंके, तालुका प्रमुख दिलीप जावळे, शहरप्रमुख पप्पु मुंडे यांच्यासह जिल्हा परिषद, नगर परिषदेचे सदस्य असलेले मतदार हजर होते.

या निर्णयामुळे लढतीत पुढे वाटणारे धस काहीसे मागे आले आहेत. काही जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील हे जगदाळे यांच्या प्रचारार्थ नसल्याचे हूल पेटवून  दिली होती. मात्र, ते ही प्रचारात सक्रीय झाले असल्याने आता विरोधकांच्या हातात काहीच कोलीत राहिले नाही. आता शेवटचे आठ दिवस शिल्लक असल्याने कोण प्रचारात बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. भाजप बीड-लातूरवर अवलंबून आहे तर राष्ट्रवादी उस्मानाबाद व बीडमध्ये पुढे आहे तर लातूरमध्ये काँग्रेसच्या मदतीने शिरकाव करीत आहे. या मतदारसंघात असलेले शंभर अपक्षाचे मतदान कोण आपल्या पारड्यात पाडून घेण्यात यशस्वी होते यावर येथील विजयी उमेदवार ठरणार आहे, हे मात्र नक्की.


सोमनाथ बनसोडे

संपादक - साप्ताहिक न्यूज सिक्सर

संपर्क :- 8087544141,8432860606

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 जिल्हा प्रशासन झाले मतमोजणीसाठी सज्ज

  उस्मानाबाद, दि.20  उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातील सार्वत्रिक निवडणूक दि.18 एप्रिल 2019 रोजी पार पडली. या मतदारसंघातून एकूण 14 उमेदवारांचे ...